टँकरमध्ये सीएनजी भरताना झालेल्या स्फोटात एकजण ठार तर दोनजण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली.
गोरेगाव पूर्वेला महामार्गावरील कामा इंडस्ट्रियल इस्टेट येथील महानगर गॅसच्या सीएनजी पंपावर शुक्रवारी सकाळी निलेश एण्टरप्राईझेस कंपनीचा एक पाण्याचा टँकर सीएनजी भरण्यासाठी आला होता. त्यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की टँकरमधील ८ सिलेंडरपैकी ३ सिलेंडर किमान १०० मीटर दूरवर फेकले गेले. त्या सिलेंडरच्या तुकडय़ांमुळे रस्त्यावरून जाणारे तीनजण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या राकेश सदा सरोज (१८) याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर सोमनाथ सुर्यवंशी आणि रमेश जोशी हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. सीएनजी सिलेंडरची मुदत २००८ मध्ये संपली होती. मात्र तरीही तो वापरात होता.
वनराई पोलिसांनी याप्रकरणी टँकरचा चालक, नीलेश एण्टरप्राईझेसचा मालक तसेच महानगर गॅसच्या पंपचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.    

Story img Loader