गेले दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर तमाम भाविक आज, बुधवारी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनंत चतुर्दशीला मुंबईत विविध ठिकाणी जवळपास ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असून यामध्ये १२ हजार सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी उसळणारी लाखोंची गर्दी आणि दहशतवादी हल्ल्याची भीती या पाश्र्वभूमीवर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईत ७२ विसर्जन स्थळांपैकी २७ समुद्रकिनारे आहेत. याशिवाय २७ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, सागर कुटीर व मार्वे चौपाटी येथे वाहने रुतू नयेत यासाठी लोखंडी फळ्या टाकण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटीवर मोठय़ा संख्येने येत असलेल्या मूर्तीच्या विसर्जनासाठी अतिरिक्त दोन तराफे व दोन बोटी यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडून २४० जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली असून नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, जीवनावश्यक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे किंवा जेली फिश यांच्यामुळे घडलेल्या घटना लक्षात घेऊन विशेष प्रथमोपचार सोयी देण्यात आल्या आहेत.
कृत्रिम तलावांमध्ये अधिकाधिक मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण स्वच्छ राखण्यास मदत करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकलशांचा वापर करावा, मोठय़ा आवाजात ध्वनिक्षेपक लावू नयेत, विसर्जनी दिनी मद्यपान करू नये व आपत्कालीन परिस्थितीत भक्तांनी सैरावैरा पळू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पोलीस सज्ज
गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईतल्या सर्व चौपाटीवर आणि विसर्जन स्थळावर पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. गिरगाव चौपाटीवर दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४ पोलीस उपायुक्त. १० सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच पाचशे पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून छेडछाड विरोधी पथक तयार ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतील राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दलाच्या तुकडय़ा आहेत. यंदा टेहळणी मनोऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. साध्या वेषातील पोलीसही गर्दीवर लक्ष ठेवून असतील.
पाखटाची भीती कायम
दीड आणि गौरी गणपतींच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर समुद्रात उतरलेल्या भाविकांना पाखटाने (स्टींग रे) चावा घेतल्यामुळे रुग्णालयात धाव घ्यावी लागली होती. पाखटांचा मुक्काम अद्याप गिरगाव चौपाटीजवळच आहे. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पाण्यात उतरताना सावधगिरी बाळगावी. पालिकेने उपलब्ध केलेल्या तराफ्यांवरून गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन अॅड्. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
मूर्तीच्या संख्येत वाढ
आतापर्यंत दीड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या एक लाख ६५ हजार ४१७ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे. गेल्या वर्षी एक लाख ९९ हजार मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते व त्यातील ४२,६६० गणेशमूर्तीचे अनंतचतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ११,८५३ सार्वजनिक मूर्ती होत्या. या वेळी मूर्तीच्या संख्येत थोडी वाढ अपेक्षित आहे.
पावसाच्या सरींची शक्यता
गेल्या आठवडय़ापासून दररोज संध्याकाळी पावसाच्या सरी पडत आहेत. अनंत चतुर्दशीदिवशीही शहरात पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत मुसळधार सरींची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
भरती व ओहोटी
बुधवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता व रात्री ११.४५ वाजता तसेच १९ सप्टेंबर रोजी ११.५५ वाजता साडेचार मीटर उंचीची भरती आहे. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता व १९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता ओहोटी आहे.