प्रसाद रावकर

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली बंदी आणि त्याबाबत प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात मुंबई पालिका दोन वर्षे अपयशी ठरली. आता त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा विचार असून, यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांतच करण्याचे बंधन घालण्याची तयारी प्रशासन पातळीवर सुरू असल्याचे समजते.

प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये दिले होते. मात्र, अल्पकाळात मोठय़ा संख्येने पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती उपलब्ध करण्याबरोबरच मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून घडवलेल्या गणेशमूर्तीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मूर्तिकारांची मागणी लक्षात घेऊन बंदी आदेशाला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे २०२० मध्ये मोठय़ा संख्येने घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. २०२१ मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यंदाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता धूसरच आहे.

दरवर्षी मुंबईत गणेशोत्सवात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी साधारण दोन लाख ५० हजारांहून अधिक गणेशमूर्तीची आवश्यकता असते. ही संख्या लक्षात घेता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करणे अशक्य आह़े  त्यामुळे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा पालिकेचा विचार आह़े  यंदा पर्यावरण संवर्धनासाठी भाविकांनीच पुढाकार घ्यावा आणि घरी किंवा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पर्यावरणस्नेही शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन करण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याचे बंधन घालण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. परिणामी, समुद्र, तलाव आदी नैसर्गिक स्रोतांमध्ये केवळ शाडूच्या गणेशमूर्तीचेच विसर्जन करण्यास परवानगी असेल, असे समजते.

दोन-तीन दिवसांत निर्णयाची शक्यता

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करून समुद्र, तलाव आदी नैसर्गिक स्रोतांमध्ये केवळ शाडूच्या गणेशमूर्तीचेच विसर्जन करण्याचा पालिकेचा विचार आहे.  याबाबत दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

Story img Loader