मुंबई : दरवर्षी दिवाळीचे औचित्य साधून राजकीय मंडळी स्वत:चे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह व नाव, विशिष्ट घोषणांचा समावेश असलेले भव्य आकाश कंदील शहर व उपनगरांतील मुख्य रस्ता, नाका आणि चौकाचौकांत उभारून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या वर्षी कोणत्या चौकात, कोणत्या पक्षाचा आकाश कंदील दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ऐन दिवाळीतच विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे शक्तिप्रदर्शन करण्याची राजकीय मंडळींची संधी हुकली. तसेच आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांच्या नेते व पदाधिकाऱ्यांकडून आकाश कंदिलांची मागणी नसल्यामुळे आकाश कंदील विक्रेत्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.

माहीमच्या प्रसिद्ध ‘कंदील गल्ली’त नक्षीदार व रंगीबेरंगी लहान – मोठ्या आकाश कंदिलांची निर्मिती आणि विक्री केली जाते. गणेशोत्सवानंतर आकाश कंदिलांची निर्मिती करण्याच्या कामाला सुरुवात होते. दिवाळीपूर्वी जवळपास दोन महिने आकाश कंदील तयार करण्याच्या कामात अनेक कुटुंबे गुंतलेली असतात. दरवर्षी ‘कंदील गल्ली’त मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यातील नागरिकांचीही घरगुती कंदील घेण्यासाठी गर्दी असते. तर राजकीय मंडळींकडूनही स्वत:चे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह व नाव, विशिष्ट घोषणांचा समावेश असलेल्या भव्य आकाश कंदिलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. पाच – सहा फुटांचे हे आकाश कंदील सहा हजारांपर्यंत विकले जातात. त्यामुळे भव्य आकाश कंदिलांमधून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे ‘कंदील गल्ली’त भव्य आकाश कंदिलांची निर्मिती कमी प्रमाणात झाली असून व्यवसायावर आर्थिकदृष्ट्या परिणामही झाला आहे.

हेही वाचा – वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी

‘आमची तिसरी पिढी कंदील विक्री व्यवसायात आहे. दिवाळीच्या महिनाभर आधी कंदील निर्मितीला सुरुवात होते. दरवर्षी राजकीय पक्षांच्या १५ ते २० कंदिलांची मागणी असते. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय मंडळींकडून काहीच प्रतिसाद नाही’, असे ‘कंदील गल्ली’तील तेजस धुरी याने सांगितले. गुरुनाथ मांजरेकर यांनी सांगितले की, ‘मी गेल्या चाळीस वर्षांपासून कंदील विक्रीचा व्यवसाय करत आहे.

दरवर्षी आमच्याकडे तसेच इतरही कंदील विक्रेत्यांकडे विविध राजकीय पक्षांकडून साधारण १५ ते २० मोठ्या कंदिलांची मागणी असते. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या कंदिलांसाठी मागणी नाही. फक्त दरवर्षीप्रमाणे इमारतींच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या कंदिलांची मागणी आहे’.

हेही वाचा – कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान

‘काम कमी झाले’

दरवर्षी आम्ही दीडशे ते दोनशे मोठे कंदील तयार करतो. त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष आणि इमारतीतील कंदिलांचा समावेश आहे. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या कंदिलांची मागणी नाही. तर दुसरीकडे इमारतीतील पदाधिकाऱ्यांकडूनही मोठ्या कंदिलांसाठी कमी प्रमाणात मागणी असून आतापर्यंत अवघ्या १५ ते २० मोठ्या कंदिलांची ऑर्डर आलेली आहे. परिणामी आचारसंहितेमुळे आर्थिक फटका बसण्यासह आमचे कामही कमी झाले आहे, असे संजय बेतबन्सी यांनी सांगितले.