मुंबई : लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व ते आज आमच्याकडे आहे, असे नमूद करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचे स्वागत केले. तर न्यायालयाने गद्दारांना दिलासा दिलेला नाही. युक्तिवादाचे न्यायालय बदलले असून आता आयोगापुढे ते केले जातील. आयोगापुढील सुनावणीसाठी आम्ही तयार आहोत, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. खरी शिवसेना कोणाची या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीस घटनापीठाने हिरवा कंदील दाखविल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशात राज्यघटना आणि कायद्यांच्या आधारे निर्णय होतात. निवडणूक आयोगही घटनात्मक संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आयोगापुढील सुनावणीस स्थगिती देण्याची मागणी फेटाळली आहे. लोकशाहीत हेच अपेक्षित होते. आम्ही कोणतीही कृती राज्यघटना किंवा कायदेशीर तरतुदींविरोधात केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात; पक्षचिन्हाबाबत सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

आमच्याबरोबर आलेल्या आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेबाबत बजावलेल्या नोटिसा चुकीच्या होत्या. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी मनमानी पद्धतीने नोटिसा दिल्या होत्या व त्यांना तसा अधिकारही नव्हता. कारण त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आमच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करणे चुकीचे नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजून निकाली निघाला नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. राज्यात अस्तित्वात असलेले हे सरकार असांविधानिक आहे व त्यांना निर्णय घेण्याचा अधिकारच नसल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> सत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील; महाविकास आघाडी सरकारच्या काळात सक्तवसुली संचालनालयापासून माहिती दडवल्याचे उघडकीस

शिवसेनेचाच विजय होईल – ठाकरे

आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, आता निवडणूक आयोगापुढे युक्तिवाद सुरू राहतील. जनतेसमोर सर्वकाही होत आहे. हा युक्तिवाद केवळ शिवसेनेसाठी नाही, तर देशातील लोकशाहीसाठी व संविधानासाठी महत्त्वाचा आहे. विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचाही विजय होईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाने आनंद व्यक्त केला, त्याविषयी ठाकरे म्हणाले, जेव्हा शिवसेनेला थोडा धक्का बसला असे वाटते, तेव्हा गद्दारांच्या गटात आनंद आणि जल्लोष केला जातो. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले, तेव्हाही ते टेबलावर चढून नाचल्याचे आपण पाहिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काही अपेक्षित नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance majority democracy eknath shinde reaction court verdict ysh