दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवापाठोपाठ यंदाचा गुढीपाडवाही र्निबधमुक्त वातावरणात साजरा होत असून राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रांवर उमटण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवून भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विविध संस्था, संघटना, मंडळांच्या आडून नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची अहमहमिका लागली आहे.
करोनापूर्व काळात डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील गिरगावसह अन्य परिसरांत मोठय़ा उत्साहात गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात येत होते. नागरिकही मोठय़ा उत्साहाने त्यात सहभागी होत. मात्र मार्च २०२० मध्ये करोनाची साथ पसरली आणि उत्सवांच्या आयोजनावर र्निबध घालण्यात आले. त्या वेळी नववर्ष स्वागतयात्रा रद्द कराव्या लागल्या. गेल्या वर्षी र्निबध काहीसे शिथिल करण्यात आल्यामुळे मोजक्याच ठिकाणी नियमांचे पालन करून अंशत: नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आल्या होत्या. यंदा र्निबधमुक्त वातावरणात नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या यात्रांमध्ये सहभागी होणारी मंडळे, संस्था आदींचे पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे, तर नागरिकांमध्येही मोठा उत्साह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढणाऱ्या संस्था, मंडळे यांच्यासह यंदा अनेक नव्या मंडळांनीही शोभायात्रांचे आयोजन केले आहे. त्यांना स्थानिक नेत्यांनी आर्थिक पाठबळही दिले आहे. मध्य मुंबई, दक्षिण मुंबईत या यात्रांचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता उपनगरांमध्येही यात्रांचे प्रमाण वाढले आहे. ध्वजपथक, ढोल-ताशा, लेझीम पथकाच्या तालावर थिरकत, निरनिराळय़ा विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्ररथांचा लवाजमा असलेल्या यात्रांनी बुधवारी अवघी मुंबापुरी दुमदुमणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्याचे पडसाद नववर्ष स्वागतयात्रांवर उमटताना दिसत आहेत. भाजप, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील नेते मंडळी, कार्यकर्ते ठिकठिकाणच्या स्वागतयात्रांच्या आडून आगामी निवडणुकांच्या प्रचारात मग्न झाले आहेत. काही ठिकाणी स्वागतयात्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचा वापर करून परस्परांना डिवचण्याचा प्रयत्नही होत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचेही मंडळांचे नियोजन आहे.