गेल्या महिन्याभरापासून मुंबईत आर्यन खान प्रकरण, एनसीबीची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदा आणि समीर वानखेडेंवर करण्यात आलेले आरोप या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईतलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत दोन महत्त्वाच्या बैठका झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सकाळी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक झाली. तासभर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित असल्यामुळे यातून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.
फडणवीस आणि मलिक यांच्याही पत्रकार परिषदा
आज दुपारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. नवाब मलिक यांच्याविषयी या पत्रकार परिषदेत ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ दुपारी १ वाजता नवाब मलिक देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे संजय राऊतांनी आज अचानक शरद पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यापाठोपाठ शरद पवारांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं निवासस्थान गाठलं आणि तिथे गृहमंत्र्यांसोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत तासभर बैठक झाली. त्यामुळे मुंबईत हालचाली वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
मोठी बातमी! शरद पवारांची भेट घेण्यासाठी संजय राऊत ‘सिलव्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण
एनसीबी वि. नवाब मलिक वादावर चर्चा?
दरम्यान, या बैठकीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. सध्या एनसीबी विरुद्ध नवाब मलिक असा जो वाद सुरू आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदांच्या आधी ही बैठक झाल्यामुळे त्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.