राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (१८ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. नुकत्याच होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक नेमकी कोणत्या कारणाने घेतली जात आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतूक केलं होतं. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांना पक्षातून बाहेर काढल्याचा आरोप केला. यालाही शरद पवार यांनी उत्तर दिलंय.
याशिवाय नुकतेच आयकर खात्यानं अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर छापे टाकल्यानं महाराष्ट्रातील राजकीय पारा चांगलाच चढलाय. या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा : “ दिल्लीवरून या सरकारला रोज त्रास दिला जातोय ” ; शरद पवारांचं मोठं विधान!
आजच्या बैठकीत भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि राजकारणावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंधन दर वाढीसह विविध मुद्द्य्यांवरून पवारांचा मोदी सरकारवर निशाणा
शरद पवार म्हणाले होते, “सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना त्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही. आपण बघतो आहोत, साधारण दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काहीना काही वाढताना दिसत आहेत, असं कधी घडलं नव्हतं.”
“केंद्र सरकारच्यवतीने सांगण्यात येतं, की आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीचा हा परिणाम आहे. पण मला आठवतयं, साधारण सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती एकदम खाली आल्या, पण केंद्र सरकारने या देशातील पेट्रोलच्या किंमती कमी केल्या नाहीत. किंवा जगभरातील पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किमतींमध्ये घसरण होत असताना, इथे मात्र किंमती वाढत राहिल्या.” असंही शरद पवार यांनी बोलून दाखवलं.