मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेतील ठाणे – भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आता या टप्प्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील कामाअंतर्गत मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर अंजुरफाटा, भिवंडी येथे ६५ मीटर लांबीची तुळई (ओपन वेब गर्डर) यशस्वीपणे उभारली आहे. हे आव्हानात्मक आणि कठिण काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात आले असून हे काम पूर्ण झाल्याने आता पहिल्या टप्प्यातील कामाला वेग मिळणार आहे.

२४.९ किमीची मेट्रो ५ मार्गिका

एमएमआरडीएकडून २४.९ किमीच्या आणि १७ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून सध्या ठाणे ते भिवंडी या पहिल्याच्या काम वेगात सुरू आहे. तर भिवंडी – कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो ५ चा विस्तार आता थेट उल्हासनगरपर्यंत होणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला मार्चमध्ये झालेल्या एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेतील पहिला टप्पा शक्य तितक्या लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरडीएने या कामाला वेग दिला आहे. तर आता या कामातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर अंजुरफाटा, भिवंडी येथे ६५ मीटर लांबीची तुळई २० मीटर उंचीवर यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. अत्यंत कठिण असे हे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात आले आहे.

४५६ मेट्रीक टन वजनाची तुळई

यशस्वीरित्या बसविण्यात आलेल्या ६५ मीटर लांबीच्या या तुळईचे वजन ४५६ मेट्रिक टन इतके आहे. ही तुळई बसविण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे रेल्वेचा मेगाब्लाॅक घेण्यात आला होता. तर मेट्रो ५ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील मेट्रो खांब पी ३२८-पी३२९ दरम्यान ही तुळई बसविण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. ही तुळई बसविण्यासाठी २५० मेट्रीक टन ते ८०० मेट्रीक टन वजनाच्या क्रेनचा वापर करण्यात आला. तर ४०० मेट्रीक टन स्ट्रक्चरल स्टीलचा वापर यात करण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.