‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना गणेश देवी यांनी मराठी भाषेसंदर्भात एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. मराठी भाषा किती जुनी आहे, तिचे वय काय याची चर्चा करण्याऐवजी मराठी भाषेची अंगे खूपच विकसित आहेत याकडे आपण लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यापेक्षा भाषेची समृद्धता जपणे जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषेच्या मरणाविषयीही त्यांनी तपशीलवार विवेचन केले. ते म्हणाले की भाषा कधी स्वत:हून मरत नाही, तर तिला मारले जाते. भाषेचे मरण हे एखाद्या पर्वतासारखे असते, अशी तुलना देवी यांनी केली. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना देवी म्हणाले, एखादी म्हैस मरताना आपल्याला दिसते. परंतु पर्वत नामशेष होताना आपल्याला दिसत नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न झालेले दगडगोटे, माती या माध्यमातून आपल्याला पर्वताचे मरण जाणवते. भाषा नामशेष होण्यास अनेक वर्षे जावी लागतात, असे देवी म्हणाले. मात्र भाषा टिकवण्यासाठी माणूस टिकवायला हवा. त्या भाषेतून होणारे आर्थिक, सामाजिक व्यवहार टिकायला हवेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Story img Loader