मुंबई : महाराष्ट्र २०३० पर्यंत हिवताप मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र डेंग्यू, हिवतापाच्या डासांची उत्पत्ती रोखणे अशक्य आहे. त्यामुळे हिवताप मुक्त महराष्ट्र करण्यासाठी सरकारला नागरिकांच्या सहभागाची अधिक आवश्यकता असल्याचे मत आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी व्यक्त केले.
हिवताप व डेंग्यू या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मात्र अनेक वेळा नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून येते. डासांची उत्पत्ती रोखणे अशक्य आहे. परंतु नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास त्याचे प्रमाण आटोक्यात आणणे शक्य असल्याचे मत डॉ. राधाकृष्ण पवार यांनी व्यक्त केले. मुंबईमध्ये डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या संपूर्णत: देशी बनावटीच्या रेनोफ्लुथ्रीन या घटकापासून बनवलेल्या उत्पादनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डासांमुळे होणारे हिवताप आणि डेंग्यूसारखे आजार केवळ गंभीर आरोग्याच्या समस्या वाढवत नाहीत, तर आर्थिक भारही टाकतात. त्यामुळे डासांपासून अत्यंत प्रभावी संरक्षण असणे अत्यावश्यक आहे. या आजारांचा सामना करण्यासाठी सुरक्षा आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेसह परिणामकारकता महत्त्वाची आहे. हिवताप आणि डेंग्यूसाठी जबाबदार असलेल्या डासांच्या प्रजातींना लक्ष्य करून, डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास रेनोफ्लुथ्रीन मदत करेल. डासांची संख्या कमी करण्यासाठी हे प्रभावी असल्याचे बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे ज्येष्ठ सदस्य डॉ.समीर दलवाई यांनी सांगितले.