राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. नगरमध्येच असे प्रकार वांरवार घडत आहेत. गृह खाते निष्क्रिय असल्यानेच गुन्हेगारांवर जरब बसविण्यात अपयश येत आहे. म्हणूनच गृह खात्याचा कारभार सुधारून पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नगरमधील घटना ही माणुसकीला काळिमा लावणारी आहे. याचा योग्य प्रकारे तपास करून सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नगरमध्ये गेल्याच वर्षी दलित समाजातील तीन तरुणांची हत्या करण्यात आली. आधीही असे प्रकार घडले आहेत. नगरच्या पोलीस अधीक्षकांची यंत्रणेवर जरब नसल्यानेच कोणाच्याही विरोधात कारवाई झाली नाही. नगरच्या या पोलीस अधिकाऱ्याला गृह खाते एवढे पाठीशी का घालते, असा सवाल काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला. गृहमंत्री आर. आर. पाटील पोलीस दलातील सुधारणांबाबत नेहमी बोलतात, पण पाटील यांचे खात्यावर नियंत्रण नसल्यानेच काही पोलीस अधिकारी मस्तवाल झाले आहेत. गृह खाते पुरते निष्क्रिय झाले असून, या खात्याचा कारभार आधी सुधारायला हवा, अशी मागणी खासदार दलवाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खैरलांजी प्रकरणही आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील गृह खात्याने गांभीर्याने हाताळले नव्हते, असा आरोपही खासदार दलवाई यांनी केला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दलितांवरील अत्याचार वाढल्यास त्याचा फटका निवडणुकीत आम्हाला बसतो, राष्ट्रवादीला या वर्गाचा जनाधारच नसल्याने त्यांचे तेवढे नुकसान होत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

Story img Loader