लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून मुंबईच्या हवेचा खालावलेला दर्जा वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे हळूहळू सुधारत असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील हवेच्या दर्जाची सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंद झाली. समीर ॲपनुसार सोमवारी सायंकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११३ इतका होता.

मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेचा समाधानकारक हवेची नोंद झाली आहे. यामध्ये मुलुंड (८८), गोवंडी-शिवाजीनगर (१००), बोरिवली (७२), भायखळा (९८), भांडूप (८३), तर मुंबई विमानतळ परिसर येथील (६६) इतका होता. शिवडी (११०), पवई (११९), विलेपार्ले (१२३) आणि वरळी (११९) इतका हवा निर्देशांक सोमवारी नोंदला गेला. म्हणजेच या परिसरातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला होता. डिसेंबर महिन्यात तर अनेकदा हवेचा दर्जा वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. काही भागात बांधकामे बंद करण्यात आली होती. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

मागील दोन महिन्यांत धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या कालावधीत अनेकांना श्वसन विकारांना आजारांना सामोरे जावे लागले होते. दरम्यान, गोवंडी येथील हवा सातत्याने वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंदली जात होती. तेथील हवा निर्देशांक २०० ते २७० इतका नोंदला जायचा. मात्र, काही दिवसांपासून तेथील हवेचा दर्जाही सुधारल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील हवा निर्देशांक आता ९० ते १०० च्या आसपास असतो. म्हणजेच हवा समाधानकारक श्रेणीत नोंदला जात आहे. तसेच या परिसरात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मॉनिटरिंग व्हॅन ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरात कोणत्या वेळी हवा अधिक प्रदूषित असते. कोणत्या धूलीकणांचे प्रमाण अधिक असते. हे समजण्यास मदत झाली व त्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. याचबरोबर काही भागात मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील पथकाने १ जानेवारी रोजी पाहणी केली असता वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने संबंधित व्यावसायिकाला नोटीस बजावली होती.

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक उपाययोजना केल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा आजघडीला मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारला आहे.

Story img Loader