मुंबई : गेले अनेक दिवस मुंबई शहर तसेच उपनगरांतील हवेचा खालावलेला दर्जा आता काही प्रमाणात सुधारला आहे. समीर अ‍ॅपच्या नोंदीनुसार शहरातील हवेच्या दर्जाची नोंद मध्यम श्रेणीत झाली आहे. दरम्यान, मागील काही दिवस पश्चिम उपनगरांतील हवेच्या दर्जात सुधारणा दिसून येत आहे. मात्र, शहरातील माझगाव, शीव, वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) तसेच विमानतळ येथील हवेचा दर्जाची दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीत नोंद होत असेलेली दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले, मालाड, मुलुंड येथील हवा गुणवत्ता निर्देशांक हा २०० ते ३०० मध्ये नोंदला जात होता. संपूर्ण ऑक्टोबर महिना या भागांत हीच परिस्थिती कायम असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच माझगाव, वरळी येथील हवा गुणवत्ता निर्देशांक देखील २०० दरम्यान नोंदला जात होता. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका यांच्यामार्फत पर्यावरण नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेक बांधकाम, उद्योगांवर कारवाई केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर पुन्हा हवेचा दर्जा खालावला. मात्र, आता पश्चिम उपनगरांमधील हवेच्या दर्जात सातत्याने सुधारणा जाणवत आहे. तेथील हवा समाधानकारक श्रेणीत नोंदली जात आहे. माझगाव, शीव, वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) तसेच विमानतळ परिसरातील हवा सातत्याने मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे. तसेच येथील हवेत पीएम १० ची मात्रा अधिक आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण सतत वाढत आहे.

हेही वाचा – मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर सात आसनी शौचालय

पीएम १० धुलीकणांचे प्रमाण कशामुळे वाढते?

बांधकाम क्षेत्र, कचरा जाळणे, औद्योगिक स्त्रोत, मोकळ्या जमिनीवरून वाऱ्याने उडणारी धूळ इत्यादी बाबींमुळे हवेतील पीएम १० धुलीकणांचे प्रमाण वाढते. दरम्यान, माझगाव येथे बांधकाम तसेच जड वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असते. सध्या येथील हवा गुणवत्ता निर्देशांक हा १०० ते २०० दरम्यान नोंदला जात आहे.

हेही वाचा – नेरुळ-खारकोपर लोकल ताशी १०५ किमी वेगाने धावणार

अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी समाधानकारक हवेची नोंद होत आहे. मात्र, माझगाव, वरळी या भागांमध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यावर कठोर निर्बंध लागू करणे गरजेचे आहे. – बी.एम. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाउंडेशन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Improving air quality in the western suburbs mumbai print news ssb