मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता शिझान खान याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने शिझान याच्या याचिकेवर निर्णय देताना ती फेटाळत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा : मुंबई : मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ
तुनिषा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी शिझान याने त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तुनिषा हिने २४ डिसेंबर २०२२ रोजी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’च्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाचा प्रियकर आणि सहकलाकार असलेल्या शिझान याला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती.