यूपीए सरकारच्या धोरणांमुळे देशातील आम आदमी गरीबीच्या खाईत लोटला जात असून असंघटीत क्षेत्रातील कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप कॉ. ए. बी. बर्धन यांनी केला.
कांदिवलीच्या कॉ. एस. ए. डांगे नगरीमध्ये भरलेल्या आयटकच्या ४० व्या अधिवेशनाचे उदघाटन करताना कॉ. बर्धन यांनी हा आरोप केला. आपला देश एका प्रचंड मोठय़ा आर्थिक संकटातून जात असून सरकारच्या धोरणामुळे आम आदमीला जगणे कठीण झाले आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक तफावत वाढत चालली आहे. देशातील ९३ टक्के जनता असंघटीत क्षेत्रात काम करत असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे संरक्षण मिळत नाही. कायम कामगारांच्या बदल्यात हंगामी, कंत्राटी कामगार भरण्यात येत आहेत. खासगीकरणाच्या विरोधात प्रत्येकाला लढावे लागणार आहे. या खासगीकरणाच्या विरोधात लढण्याचे आवाहन कामगार संघटनांपुढे असल्याचे, सांगून बर्धन यांनी १५ कोटी कामगार फेब्रुवारीमध्ये दोन दिवसांचा देशव्यापी बंद करणार असल्याचे यावेळी सांगितले. भारताच्या नवनिर्माणासाठी कामगारांनी करायच्या संघर्षांची दिशा या अधिवेशनात ठरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या अधिवेशनाच्या उदघाटन सत्रामध्ये भारतीय मजदूर संघाचे नेते वैजनाथ राय, सिटूचे सरचिटणीस खासदार तपन सेन, आयटकचे सरचिटणीस खासदार गुरुदास दासगुप्ता, राजीव डिंगरी, राधाकृष्णन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा