मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणे सध्या काठोकाठ भरली असली आणि वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असली तरी मध्य मुंबईतील वरळी, लोअर परळ, करी रोड या भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे या भागातील इमारतींना सध्या टँकर मागवावे लागत आहेत.
या संपूर्ण परिसराला सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विभागही या पाणीटंचाईचे कारण शोधण्यात अपयशी ठरला आहे. या प्रकरणी मंगळवारी वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘जी’ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या ९३ टक्के पाणीसाठा आहे. सर्व धरणांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
हे ही वाचा… वाहतूक समस्येसाठी ‘टाटा’कडून आराखडा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती
धरणांतील पाणीसाठा वाढताच पालिकेने पाणीकपात अधिकृतपणे मागे घेतली. मात्र, तरीही मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मध्य मुंबईचा भाग असलेल्या वरळी, लोअर परळ, करीरोड या परिसरात गेल्या किमान पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील निवासी आणि व्यावसायिक इमारतींना पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.
निवासी इमारतीना रोज टँकर मागवावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोअर परळ स्थानक परिसर, सीताराम जाधव मार्ग, सेनापती बापट मार्ग, करी रोड, वरळी येथील सेंच्युरी म्हाडा इमारत परिसर, फिनिक्स मिलच्या समोरील रेल्वेच्या वसाहती येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. इमारतींच्या टाक्याही पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
याबाबत जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, सध्या या भागात येणाऱ्या पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे कुठे पाणी गळती होते आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच पाण्यचा दाब कमी असल्याची बाब वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आली असून यंत्रणेत काही दोष आहे का याचीही तपासणी केली जात आहे. दाब कमी का आहे, याचा शोध लागल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. वरळी हा ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असून आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. याच परिसरात पाणी येत नसल्यामुळे ठाकरे यांनी याची दखल घेतली असून जी दक्षिण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
हे ही वाचा… Maharashtra News Live: १७ ऑगस्टपर्यंत १ कोटी भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणार – देवेंद्र फडणवीस
अनेक भागांत पाणी टंचाई आहे, दूषित पाणी येत आहे. पाण्याबाबतच्या तक्रारी येत आहेत. यामागील कारणांची माहिती पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनीही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.