मुंबई : चेंबूरच्या सुभाष नगर परिसरातील इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना रविवारी सकाळी महानगर गॅसची वाहिनी तुटली. मात्र चार दिवसानंतरही या वाहिनीची दुरुस्त करण्यात आलेली नाही. परिणामी दोन इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या ७२ कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून महानगर गॅस कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.

चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात म्हाडाच्या अनेक जुन्या इमारती असून त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. येथील इमारत क्रमांक ४७ येथे रविवारी सकाळी खोदकाम सुरू होते. या खोदकामाच्या वेळी जमिनीखालून गेलेली गॅसची एक वाहिनी तुटली. परिणामी बाजूला असलेल्या इमारत क्रमांक ५१ आणि ५२ मधील रहिवाशांचा गॅस पुरवठा खंडीत झाला. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. गॅस वाहिनी तुटल्याची माहिती मिळताच कंपनीतील काही कर्मचारी तेथे आले. मात्र नेमकी गॅस वाहिनी कुठे तुटली हे कर्मचाऱ्याना समजू शकले नाही.

हेही वाचा…अमेरिकन वकिलातीत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

गेल्या चार दिवसांपासून कर्मचारी तुटलेल्या गॅस वाहिनीचा शोध घेत आहेत. मात्र बुधवारपर्यंत त्यांना त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे इमारत क्रमांक ५१ आणि ५२ मध्ये वास्तव्यास असलेले रहिवासी संतप्त झाले आहेत. दरम्यान, या दोन्ही इमारतींचा गॅस पुरवठा गुरुवारपर्यंत सुरळीत झाला नाही, तर महानगर गॅस कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका आशा मराठे यांनी दिला आहे.

Story img Loader