मुंबई : डोळ्यांच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या उत्तर प्रदेशमधील वृद्ध महिलेचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गेनाबाई गौड (६०) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या मूळच्या उत्तर प्रदेश येथील राहणाऱ्या आहेत. डोळ्यांवर उपचार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची सून त्यांना येथील अण्णाभाऊ साठे उद्यानात फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेली होती. फेरफटका मारल्यानंतर त्या घरी निघाल्या. सुमन नगर जंक्शन येथे पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर वाहनचालकाने तेथून पोबारा केला.
हेही वाचा : मुंबईतील सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा
वाहनाची धडक बसताच गेनाबाई गंभीर जखमी झाल्या आणि रस्त्यावर कोसळल्या. काही नागरिकांनी तत्काळ त्यांना परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नेहरूनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.