मुंबई: चेंबूर परिसरात सेंट सेबेस्टीयन शाळेपासून सह्याद्रीनगर रोड येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ८९ झाडे कापावी लागणार आहेत. तर ३५ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. या रस्त्याच्या टोकाला एक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी हे रुंदीकरण केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
आरसीएफ मार्गावरील झाडांवर पालिकेच्या एम पूर्व विभागाने नोटीसा चिकटवल्या आहेत. पूर्ण वाढलेल्या मोठमोठ्या झाडांवर या नोटीसा लावण्यात आल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे. सेंट सेबेस्टीयन शाळेपासून सह्याद्रीनगर रोड येथील रस्ता १३.४० मीटरचा आहे. या रस्त्याची रुंदी १८.३० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी ही झाडे कापावी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा… कन्नमवार नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग १७ वर्षांनी मोकळा!
मात्र या रुंदीकरणाची गरज नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी व्यक्त केले आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात या रस्ता रुंदीकरणाचा समावेश नाही. मात्र केवळ झोपू प्रकल्पाच्या विकासकाचा फायदा व्हावा म्हणून हे रुंदीकरण हाती घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा रस्ता पुढे एका बाजूने बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर फारशी वाहतूक नसते. मात्र तरीही या रस्त्याच्या रुंदीकरणाचा अट्टाहास कशाला, असा सवालही गॉडफ्रे यांनी केला आहे. त्यामुळे या रुंदीकरणासाठी झाडांचा बळी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.