मुंबई : चेंबूर येथे मंगळवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीची ६० ते ९० डेसिबल दरम्यान नोंद झाली. या फटाक्यांचा आवाज नियमानुसार मर्यादित असला तरी त्यामध्ये बेरियम, सल्फर आणि कॉपर ही घातक रसायने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत विकण्यात येत असलेले पर्यावरणपूरक फटाकेही घातकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी विक्रीस ठेवलेल्या पर्यावरणपूरक फटाक्यांच्या आवाजाची चाचणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज ‘फाउंडेशन’च्या वतीने करण्यात येते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने चेंबूर येथील ‘आरसीएफ’ मैदानात मंगळवारी विविध फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजली. तसेच या फटाक्यांमधील रसायनांची ‘आवाज फाउंडेशन’तर्फे तपासणी करण्यात आली. या तपासणीनुसार फटाक्यांत बेरियम, सल्फर आणि कॉपरसारखे पर्यावरणाला घातक ठरणारे धातू आढळून आले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बेरियम आणि प्रतिबंधित रसायनांपासून तयार केलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. बेरियम अत्यंत घातक रसायन असून ते फटाक्यांमध्ये वापरले जाते.

हेही वाचा…मुंबईतील पूरस्थितीवर हरित छताची मात्रा

u

देशात २०१८ मध्येच बेरियम, तसेच बेरियम क्षारांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही फटाक्यांमध्ये त्याचा सर्रास वापर केला जात आहे. फटाक्यांमध्ये प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये त्यांचा वापर होत आहे. ही बाब गंभीर आहे, असे ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमैरा अब्दुलली यांनी सांगितले.

चाचणीत सर्व फटाक्यांचा आवाज मर्यादेत असल्याचे समोर आले असून प्रत्येक फटाक्यांचा आवाज ६० ते ९० डेसिबल दरम्यान आहे. एका फटाक्यासाठी १२५ डेसिबल इतकी आवाज मर्यादा आहे. यंदा केलेल्या चाचणीत प्रथमच सर्व फटाक्यांचे आवाज मर्यादेत आहेत. दरम्यान, निवासी परिसरात ५५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत हीच मर्यादा अनुक्रमे ५० व ४० डेसिबल इतकी आहे.

हेही वाचा…३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा, एक लाख ११ हजार १६९ कामगारांची कागदपत्रे सादर

अशक्तपणा, श्वसनात अडसर

बेरियम असलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. बेरियमचे घटक शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, श्वसनात अडसर, अर्धांगवात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

डोळे, पचनसंस्था, श्वसनसंस्था व त्वचेवरही बेरियममुळे दुष्परिणाम होतो. बेरियममुळे पोट आणि आतड्यासंबंधी समस्या, तसेच चेहरा सुन्न होणे, स्नायू कमकुवत होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

बेरियम क्षारामुळे श्वसनाचा त्रास होतो. यामुळे फुफ्फुसाच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. प्रदूषणात भर घालणाऱ्या फटाक्यांना पर्याय म्हणून बाजारात पर्यावरणपूरक फटाके विक्रसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. पण आता तेही घातक असल्याचे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे.