मुंबई : खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचविणाऱ्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करून त्याचा मोबाइल घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी रात्री चेंबूर परिसरात घडली. तरुणाने याबाबत केलेल्या तक्रारीच्या आधारे चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचविणाऱ्या कंपनीमध्ये अजितेश सिंग (२३) हा काम करतो. चेंबूर परिसरातील एका ग्राहकाला मंगळवारी रात्री खाद्यपदार्थ देण्यासाठी तो गेला होता. खाद्यपदार्थ घरी दिल्यानंतर तो चेंबूरच्या छगनमिठा या पेट्रोलपंपाजवळ उभा राहून फोनवर बोलत होता. याच वेळी तेथे आलेल्या तिघांनी त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला. अजितेशने त्यांना विरोध केला असता तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून तिघांनी तेथून पळ काढला.
अजितेशने याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस याप्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.