मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने आपल्या अखत्यारितील विविध जिल्ह्यांतील २० अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करून संगणकीय पद्धतीने अर्जनोंदणी आणि स्वीकृतीला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. या भूखंडांचा ई लिलावाचा निकाल १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या अखत्यारितील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, जालना जिल्ह्यातील टोकवाडी आणि भोकरदन, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, लातूर जिल्ह्यातील मुरुड, तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका येथील एकूण २० अनिवासी व्यावसायिक, सुविधा भूखंडांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
हेही वाचा : आरेतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; तातडीने दुरुस्तीचे आदेश
अनिवासी भूखंडांचा ई लिलाव संगणकीय पद्धतीने करण्यात येणार असून अर्जदारांना अर्ज करण्याची कार्यपद्धती तसेच सविस्तर माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदार मंडळाच्या ई-लिलाव प्रक्रियेत म्हाडाच्या http://www.eauction.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करणे, अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. ई लिलावासाठी अर्ज करण्याची मुदत ५ एप्रिल रोजी रात्री ११. ५९ वाजता संपणार आहे. ई लिलावासाठी आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत ६ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. ई-लिलाव संगणकीय पद्धतीने १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोली लावता येणार आहे. ई – लिलाव प्रक्रियेचा एकत्रित निकाल १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहीर केला जाणार आहे.