मुंबई : फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १२ हजार घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या रुपाने ९०० कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. फेब्रुवारीच्या २८ दिवसांत १२ हजारांहून अधिकची घरविक्री झाल्याने ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे.मागील दहा वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील मुंबईतील घरांच्या विक्रीचा विचार करता घरविक्री संख्या ५ ते १० हजारांच्या दरम्यान होती. मात्र २०२४ मध्ये पहिल्यांदाच घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा पार केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये १२ हजार ५५ घरांची विक्री झाली आणि यातून ८८५ कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकार मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर आता २०२५मध्येही घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. फेब्रुवारी, २०२५ मध्ये २८ दिवसांच्या कालावधीत १२ हजार घरांची विक्री झाली आहे. मागील महिन्यात, जानेवारीतही १२ हजारांहून अधिक घरे विकली होती. फेब्रुवारीतही मुंबईतील घरविक्रीने १२ हजारांचा टप्पा गाठला असल्याने २०२५ वर्षे घरविक्रीस चालना देणारे असणार असल्याचे बांधकाम क्षेत्राकडून सांगितले जात आहे. दरम्यान फेब्रुवारी २०२५ मध्ये ५० लाख त एक कोटी अशी किंमतीतील घरांना ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे. एकूण घरविक्रीच्या ३० टक्के घरे ही ५० लाख ते एक कोटी दरम्यानच्या किमतीची आहेत. मात्र त्याचवेळी ५० लाखांदरम्यानच्या घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ५० लाखांपर्यंतची २९ टक्के घरे विकली गेली होती. तिथे फेब्रुवारी २०२५ मध्ये ५० लाखांपर्यंतच्या घरांच्या विक्रीची टक्केवारी २६ टक्के अशी असून यात काहीशी घट दिसत आहे. परिणामी ५०० चौ. फुटांच्या घरविक्रीतही घट झाली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ५०० चौ. फुटांची ४८ टक्के घरे विकली गेली होती. पण यावेळी, फेब्रुवारी २०२५ मध्ये मात्र ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांच्या विक्रीची टक्केवारी केवळ ३८ टक्के अशी आहे.

मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली असली तरी ५०० ते १००० चौ. फुटापर्यंतच्या घरविक्रीत मात्र चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षी फेब्रुरवारीत ५०० ते १००० चौ. फुटापर्यंतची ४३ टक्के घरे विकली गेली होती तिथे यावेळेस ४८ टक्के घरे विकली गेली आहेत. १००० ते २००० चौ. फुटापर्यंतच्या घरांच्या विक्रीतही यावेळेस चांगली वाढ झाली आहे. कारण मागील वर्षी फेब्रुवारीत १००० ते २००० चौ. फुटांपर्यंतची केवळ ८ टक्के घरे विकली गेली होती तिथे फेब्रुवारी २०२५ मध्ये १००० ते २००० चौ. फुटांपर्यंतच्या घरविक्रीची टक्केवारी थेट १३ टक्के अशी आहे. एकूणच फेब्रुवारीत घरविक्री समाधानकारक राहिली असून मोठ्या आणि महागड्या घरांची विक्री या महिन्यात अधिक झाली आहे.