मुंबई : महाराष्ट्रात १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या कालावधीत सुमारे एक हजार ०४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून या आकडेवारीवरून दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून सर्वाधिक आत्महत्या झालेले पहिले चार जिल्हे अमरावती विभागातील आहेत.

राज्यात प्रत्येक महिन्याला सरासरी २०९ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील एकूण एक हजार ०४६ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक १४३ आत्महत्यांची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. दुसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात १३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास निम्म्या (४६१) आत्महत्या अमरावती विभागात झाल्यामुळे या विभागातील गंभीर संकट अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र सरकारने अमरावती विभागातील या चार जिल्ह्यांमध्ये तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

हेही वाचा – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : आरोपी अंगरक्षकाच्या सहभागाचा दावा संशयास्पद, सत्र न्यायालयाचे मत

द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मिळविली आहे. ‘अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात अपयश आले आहे. आर्थिक सवलत, मानसिक आरोग्य आणि शाश्वत कृषी पद्धती प्रदान करण्यासाठी त्वरित आणि सर्वसमावेशक उपाय करणे आवश्यक आहेत. कृषीप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन आणि उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि समाजाने एकत्र येवून प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे’, असे मत जितेंद्र घाडगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित कर्ज बुडवल्याचे प्रकरण : सीबीआय न्यायालयाचे मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

आकडेवारीचा विचार केल्यास कोकण विभागात पाच महिन्यांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. पुणे विभागात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ८ आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. नाशिक विभागात ११५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक ७६ आत्महत्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. छत्रपती संभाजी नगर विभागातही ३४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत. नागपूर विभागातही ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक म्हणजे ५५ आत्महत्या वर्धा जिल्ह्यातील आहेत.