मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे. जागेच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण झाली आहे. आता केवळ जागेबाबत भविष्यात काही अडचणी आल्या वा काही आर्थिक मोबदला द्यावा लागला तर याबाबतच्या जबाबदारीबाबतचे एक हमी पत्र एमएमआरडीएकडून घेणे शिल्लक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो ६ मार्गिकेतील प्रस्तावित कांजूरमार्ग येथील कारशेड वादात अडकले होते. एमएमआरडीएने पर्यायी जागांचा शोधही घेतला होता. पण कांजूरच्याच जागेवर सरकार आणि एमएमआरडीए ठाम असल्याने इतर पर्याय बाजूला ठेवण्यात आले. अशात मेट्रो ६ चे ६६ टक्क्यांहून काम पूर्ण झाले असताना आणि ही मार्गिका २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असताना कारशेड अडकले होते. त्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली होती. पण आता मात्र कारशेडचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. कांजूरमधील स.नं. २७५, न.भू. क्र.६५७ अमधील ४१ हेक्टर जागेपैकी १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला मेट्रो ६ कारशेडसाठी देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करत जागा द्यावी असे आदेश महसूल विभागाने दिल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लोकसत्ताला दिली.

या आदेशानुसार हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच महाअधिवक्त्यांकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली आहे. आता केवळ एमएमआरडीएकडून एक हमी पत्र घेणे शिल्लक आहे. भविष्यात या जागेबाबत काही वाद निर्माण झाला तर वा जागेपोटी आर्थिक भरपाई द्यावी लागली तर ही सर्व जबाबदारी एमएमआरडीएची असेल यासंबंधीचे हे हमीपत्र आहे. तेव्हा हे हमीपत्र घेत येत्या तीन ते चार दिवसांत ही जागा एमएमआरडीएकडे दिली जाईल असेही भोसले यांनी सांगितले. जागा ताब्यात मिळण्याबाबत महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना विचारले असता त्यांनी जागा ताब्यात आल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ असे सांगितले आहे. तर सरकारकडून हमी पत्र मागण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.  

जागेचा वाद काय?

एमएमआरडीएने मेट्रो ६ मार्गिकेसाठीचे कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित केले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने या कारशेडला २०१६ मध्येच मंजुरी दिली होती. याच जागेवर मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेसह मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) आणि मेट्रो १४  (बदलापूर ते कांजूरमार्ग) मार्गिकेसाठी एकात्मिक कारशेड बांधण्याचा निर्णय २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानुसार आरे कारशेड कांजूरला हलविले. मात्र आरे कारशेड कांजूरला हलविण्यास भाजपचा विरोध होता आणि त्यात कांजूरच्या जागेवरुन वाद सुरू झाला. हा वाद न्यायालयात गेला आणि एकात्मिक कारशेड प्रकल्प अडकला. कांजूरच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला. आरे वाचवा आंदोलकांनी कांजूरलाच कारशेड व्हावे अशी मागणी उचलून धरली. न्यायालयात वाद सुरू असतानाच  २०२२ मध्ये सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने कांजूरमधील मेट्रो ३ चे कारशेड पुन्हा आरेत नेले. तर एकात्मिक कारशेड प्रकल्पाला धक्का दिला. आरेत मेट्रो ३ कारशेडचे काम सुरू झाले.तर मेट्रो ४ कारशेडसाठी मोघरपाडय़ाची जागा निश्चित केली असून आता लवकरच येथे बांधकाम सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कांजूरच्या जागेचा केंद्र आणि राज्य सरकारमधील न्यायालयीन वादही मिटला आहे. त्यामुळेच आता कांजूरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो ६ कारशेडसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता याला ठाकरे गटाने तसेच आरे वाचवा आंदोलनाने विरोध केला आहे.

मेट्रो कारशेडबाबत घेतलेली भूमिका व्यवहार्यता तपासूनच

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करून बोलतील, अशी अपेक्षा होती. पण ते निर्बुद्धासारखे बोलत आहेत, हे दुर्दैव आहे. कांजूरमार्गच्या १५ एकरच्या जमिनीबाबत सरकारने व्यवहार्यता तपासूनच भूमिका घेतली आहे. त्यामुळे मेट्रो ३ चे काम पूर्ण होऊन अन्य कामाला मदत होणार असून दररोजचा साडेपाच कोटी रुपयांचा तोटा भरून निघेल, असे प्रत्युत्तर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिले आहे. आरेमध्ये आणि इंटिग्रेटेडमध्ये नव्याने झालेला खर्च राज्य सरकारच्या निर्णयाने वाचेल. यासंदर्भात आदित्य ठाकरेंची शिकवणी घ्यायला  तयार आहे. मेट्रो ३, ६ आणि १० यांचे एकत्रित कारशेड असावे, ही भूमिका ठाकरे सरकारची होती. यासाठी समिती नेमली होती. मेट्रो तीनची कारशेड आरेमध्येच करणे सोयीस्कर आहे, असा या समितीचा अहवाल आहे. आरेमध्ये कारशेड केलेला खर्च पाण्यात घालून कांजूरमार्गमध्ये  कारशेड बांधण्याचा खर्च वेगळा करावा लागला असता. यात  शहाणपणा कुठे आहे? असेही शेलार यांनी सांगितले.