विक्रोळीतील टागोरनगरच्या पुनर्विकासासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्याची तयारी करणाऱ्या म्हाडाने सामान्यांसाठी घरे निर्माण व्हावीत, यासाठी आपल्या मालकीचे भूखंड शोधून ते मोकळे करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गोरेगाव पश्चिमेतील १३ एकर भूखंड रिक्त केल्यानंतर आता दिंडोशीतील १८ एकर भूखंड रिक्त करण्यात यश मिळविले आहे. यामुळे भविष्यात सामान्यांना विविध गटांत २० ते २५ हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सामान्यांच्या घरांसाठी म्हाडाकडे सध्या मोकळे भूखंड नाहीत. मात्र काही भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. असे भूखंड अधोरेखित करून ते मोकळे करण्याची मोहिम म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी सतीश गवई तसेच मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी के. सुधांशु यांनी आखली आहे. पुनर्विकास कक्षाचे प्रमुख व कार्यकारी अभियंता रामा मिटकर यांच्या नेतृत्त्वाखाली गोरेगाव येथील ‘हायपर सिटी’ या मोक्याच्या ठिकाणी असलेला १३ एकरचा भूखंड रिक्त करण्यात आला होता. या भूखंडावर झोपडय़ा उभारून एका खासगी विकासकाने आपला फलक लावला होता. मात्र या भूखंडावरील ताबा स्पष्ट करून न शकल्याने म्हाडाने बुलडोझर लावून हा भूखंड मोकळा करून घेतला. या भूखंडावर आता सामान्यांसाठी पाच हजार घरे बांधली जाणार आहेत.
अलीकडेच दिंडोशीतील १८ एकर भूखंड मोकळा करून घेण्यात आला आहे. या भूखंडावरही काही गुंडांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला न जुमानता म्हाडाने ही कारवाई केली आहे. विक्रोळीतील टागोरनगर वसाहत ही भाडे तत्त्वावर असल्यामुळे ती विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढल्या जाणार आहे. त्यातूनही सामान्यांसाठी तब्बल सहा हजार घरे उपलब्ध होणार आहे. याशिवाय म्हाडाच्या भूखंडावर असलेल्या सुमारे ६५ झोपु योजनांसाठीही निविदा काढल्या जाणार आहेत.
भविष्यात सामान्यांसाठी २० ते २५ हजार घरे उपलब्ध होणार
विक्रोळीतील टागोरनगरच्या पुनर्विकासासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्याची तयारी करणाऱ्या म्हाडाने सामान्यांसाठी घरे निर्माण व्हावीत, यासाठी आपल्या मालकीचे भूखंड शोधून ते मोकळे करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
First published on: 15-12-2012 at 03:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In future 20 to 25 thousand home will available