लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः गोवंडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून सत्तार ऊर्फ पप्पू सय्यदची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाला अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला.
सत्तारचा भाऊ अन्सार सय्यद याच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्या व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बैंगनवाडी येथील हक्कानी चायनीज सेंटरजवळ शुक्रवारी ही घटना घडली. तक्रारीनुसार, आरोपी मुशीर मंजुर खानने (२७) अनैतिक संबंधांच्या संशयावरून सत्तारला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर खानने चाकूने सत्तारच्या मनगट व छातीत भोसकले.
हेही वाचा… VIDEO: गोष्ट मुंबईची भाग : १०८ | मुंबईचा ‘जिवंत वारसा’ जपणारी दुर्मीळ वृक्षसंपदा – भाग १
गंभीर जखमी झालेल्या सत्तारला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण सत्तारचा भाऊ अन्सार याच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी पहाटे खानला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.