मुंबई : कोडीयन या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन सराईत आरोपीना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक आरोपींकडून कोडीयन सिरपच्या २४० बाटल्या हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात दिवसेंदिवस अमली पदार्थांची तस्करी वाढत असून तस्करी रोखण्यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे एक पथक मंगळवारी रात्री परिसरात गस्त घालत होते. यावेळी येथील नारायण डेअरी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहून दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील गोणीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात कोडीयनच्या २४० बॉटल सापडल्या. त्यांची किमत १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. रफिक सय्यद (४५) आणि वहाबुल खान (२८) अशी या अटक आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत.