मुंबई : कमी किमतीत सोन्याचे दागिने देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने कुर्ल्यातील गृहिणीचे खरे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गृहिणीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
कुर्ला (प.) येथे वास्तव्याला असलेल्या निर्मला (३५) ३ जानेवारी रोजी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना रस्त्यात एक महिला भेटली. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असून ते ट्रेनमध्ये सापडल्याचा बनाव सदर महिलेने केला. हे दागिने मला कमी किमतीत विकायचे आहेत, असे सांगून ती महिला निर्मलासोबत तिच्या घरी गेली. तिने विश्वास संपादन करण्यासाठी निर्मलाला सोन्याचा एक दागिना दिला. निर्मला बाजूलाच असलेल्या सोनाराकडे तो दागिने घेऊन गेली. सोनाराने तपासणी करून दागिना खरा असल्याचे सांगितले.
हेही वाचा…भारत नगरमधील बांधकामांवरील कारवाईविरोधात, ठाकरे गटाचे आंदोलन कारवाईदरम्यान गोंधळ
निर्मलाची खात्री पटताच आरोपी महिलेने तिच्याकडे पैसे न मागत्या सोन्याच्या जुन्या दागिन्यांची मागणी केली. त्यानुसार निर्मलाने चांदी आणि सोन्याचे असे एकूण ५० हजार रुपयांचे दागिने सदर महिलेला दिले. आरोपी महिलेने तिच्याकडीस बनावट सोन्याचे दागिने निर्मलाला दिले आणि तेथून पळ काढला. ५० हजार रुपयांच्या दागिन्यांच्या बदल्यात दीड ते दोन लाखांचे दागिने मिळाल्याने निर्मला आनंदी झाली होती. मात्र हा आनंद क्षणभरच टीकला. निर्मला तत्काळ ओळखीच्या सोनारकडे गेली. तपासणी केली असता ते सर्व दागिने बनावट असल्याचे उघड झाले. अखेर निर्मलाने याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.