मुंबई : राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातील करोनाच्या ‘जे.एन.१’ या नव्या उपप्रकाराची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत ‘जे.एन.१’चे ६६६ रुग्ण सापडले असून करोनाचे दोन हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच करोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला आलेले करोनाचे संकट अवघ्या काही दिवसांत नियंत्रणात आले. करोनाचा नवा उपप्रकार ‘जे.एन.१’मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत ‘जे.एन.१’चे तब्बल ६६६ रुग्ण सापडले आहेत. ‘जे.एन.१’चा हा नवा उपप्रकार फारसा घातक ठरल नसला तरी मागील ४२ दिवसांत राज्यामध्ये करोनाचे तब्बल २ हजार ७०३ रुग्ण सापडले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ५५७ करोनाचे रुग्ण सापडले होते. तर फेब्रुवारीत आतापर्यंत करोनाचे सुमारे २०० रुग्ण सापडले आहेत. करोनाचे बहुतांश रुग्ण शहर भागात आढळले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी – चिंचवड आणि छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत करोनामुळे तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आठवडानिहाय रुग्णसंख्या
१ ते ७ जानेवारी – ८९५
८ ते १४ जानेवारी – ६६२
१५ ते २१ जानेवारी – ४४१
२२ ते २८ जानेवारी – २३७
२९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी – २६०
५ ते १० फेब्रुवारी – २०८
एकूण – २७०३