मुंबई : केंद्र सरकारचे साखर, इथेनॉल बाबतचे धोरण आणि कारखान्यांनी आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. सुमारे ७० कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहेत. गतवर्षी ३५ आणि यंदा ३२ कारखान्यांची कर्जे थकीत आहेत, तर दोन वर्षांत ३७ कारखाने अवसायानात निघाले आहेत.
राज्य सहकारी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, उसाच्या गतवर्षीच्या हंगामात राज्य सहकारी बँकेकडून १३३ सहकारी साखर कारखान्यांनी साखर तारण, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ६१ कारखान्याचे आर्थिक ताळेबंद चांगला आहे. पण, ३५ कारखान्यांची कर्जे थकली आहेत. यंदाच्या चालू गळीत हंगामात १३० सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी ६१ कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, तर ३२ कारखान्यांची कर्जे थकली असून, दोन वर्षांत ३७ कारखाने अवसायानात निघाले आहेत.
गत हंगामातील साखर तारण कर्ज, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीच्या कर्ज, असे एकूण १० कोटी ५३ लाख २१९ रुपये कर्ज थकले आहे. यंदाच्या चालू हंगामातील ९ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. थकीत कर्जाची रक्कम कमी असली तरीही सुमारे ७० कारखाने कर्जांची फेररचना करण्याच्या आर्थिक स्थितीही नाहीत.
आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची भूमिका
राज्य सहकारी बँक सहकारी संस्थांची शिखर बँक आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे बँकेचे कर्तव्य आहे. सहकारी कारखाने बंद पडले म्हणून विक्रीस काढले की, खासगी कारखानदार सहकारी कारखाने विकत घेतात. त्यामुळे सहकारी कारखान्यांची संख्या वेगाने कमी होताना आणि खासगी कारखान्यांची संख्या वेगाने वाढताना दिसून येते. त्यामुळे बंद असलेले सहकारी कारखाने भाडेत्त्वावर चालविण्यास देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे सहकरी कारखाने जीवंत राहतात, काही काळानंतर फायद्यात येतात. या पुढेही बंद पडलेले कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास देऊन सहकारी कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती राज्य सहकारी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
मार्गदर्शक तत्त्वानुसार मदत
राज्यातील सुमारे ७० सहकारी कारखाने विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यापैकी ३७ कारखाने अवसायानात निघाले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य सहकारी बँक आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांनी मदत करेल. सहकार चळवळीला बळ देणे राज्य सहकारी बँकेचे मुख्य काम आहे, अशी माहिती राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.