मुंबई : प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्करोग रुग्णांसाठी डे केअर केंद्र सुरू करण्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये केली. त्यापाठोपाठ आता सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढील एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्करोग रुग्णांसाठी डे केअर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर, जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे राज्यातील कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील ३० वर्षावरील लोकांचे मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहीमेंतर्गत राज्यात निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक उपचार विनामूल्य मिळण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपचारादरम्यान कर्करोग रुग्णांना डे केअर सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

सध्या राज्यामध्ये १४ जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील रुग्णांना डे केअर सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये कर्करोग रुग्णांसाठी डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

जनजागृतीवर भर

‘राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम’ यशस्वी होण्यासाठी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (मनपा) यांनी आपापसांत समन्वय साधून मोहीम व कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये आकाशवाणी, वृत्तपत्रे, केबल इत्यादी माध्यमांतून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए), रोटरी क्लब, लायन्स क्लब, महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स या खासगी संस्थांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.