मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, १९ मार्चपासून प्रवेश परीक्षा सुरू होत आहेत. प्रवेश परीक्षेला एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरूवात होणार आहे. तर एमएचटी सीईटीची परीक्षा अखेरीस हाेणार आहे. राज्यभरातून विविध व्यावासायिक अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले. त्यानंतर एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांने नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला २५ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली. १९ विविध अभ्यासक्रमांपैकी आता बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया शिल्लक असून, विधि तीन वर्षे व पाच वर्षे अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित सर्व अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
एम.एड, एम.पी.एड अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरुवात
राज्यभरातून तब्बल १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षासाठी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. एमएचटी सीईटीसाठी सर्वाधिक ७ लाख ६५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर सर्वात कमी अर्ज एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमासाठी करण्यात आले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १९ मार्चपासून प्रवेश परीक्षांच्या धडाका सुरू होणार आहे. यामध्ये एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमाने प्रवेश परीक्षेला सुरुवात होणार आहे. एम.एड या अभ्यासक्रमासाठी ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी, तर एम.पी.एड या अभ्यासक्रमासाठी २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांचेही अर्ज
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १३ लाख ४३ हजार ४१३ अर्ज आले असून त्यात अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांसह तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या अर्जाचाही समावेश आहे. यामध्ये १ हजार ५५८ अनाथ विद्यार्थ्यांनी, तर ४ हजार ८३६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच राज्यभरातून ४८ तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यामध्ये एमएचटी सीईटीसाठी सर्वाधिक २१ अर्ज आहेत, तर एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमासाठी ९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
असे आहे परीक्षांचे वेळापत्रक
तारीख – अभ्यासक्रम – अर्ज
१९ मार्च – एम.एड – ३८०९
१९ मार्च – एम.पी.एड – २३८४
२३ मार्च – एमसीए – ५६२५७
२४ मार्च – बी.एड – ११६५८५
२७ मार्च – एम.एचएमसीटी – ८०
२७ मार्च – बी.पी.एड – ६५९८
२८ मार्च – बी.एचएमसीटी – १४३६
२८ मार्च – बी.एड – एम.एड – ११३९
२९ मार्च – बी.डिझाईन – १३२८
१ एप्रिल – एमबीए/एमएमएस – १५७२८१
५ एप्रिल – फाईन आर्ट – २७८९
७ एप्रिल – नर्सिंग – ४७४९७
८ एप्रिल – डीपीएन/पीएचएन – ४७७
९ एप्रिल – एमएचटी – सीईटी (पीसीबी) – ३०१०७२
१९ एप्रिल – एमएचटी – सीईटी (पीसीएम) – ४६४२६३
२८ एप्रिल – विधी तीन वर्षे – ३३१३३
२९ एप्रिल – बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम – ५८३८४
३ मे – विधी तीन वर्षे – ८७९३७