मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. राज्यभरातील बचतगटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १० जिल्ह्यांत आणि नंतर टप्प्याटप्प्याने ‘उमेद मॉल’ तयार करण्यात येणार आहेत. राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचाही संकल्प आहे. सध्या १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत २५ लाख लखपती दीदींची उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद व राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केले. या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर आदी उपस्थित होते.
‘उमेदच्या’च्या माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचतगटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. त्यांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारण्यात येतील व त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.