मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे कर्मचारी दिवाळी भेटीची वाट पाहत होते. अखेर गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळी भेट जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिवाळी भेट मिळाली नाही. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी झाल्यानंतरही बोनस मिळाला नव्हता. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दिवाळी भेट वितरित केली जाईल, असे स्पष्ट करीत बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठविले होते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवले. एकीकडे बेस्ट उपक्रमाच्या बोनसचा तिढा सुटला. तर, दुसरीकडे एसटी महामंडळातील ९० हजार कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली.
हेही वाचा : मोबाइल घेण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याची हत्या
गेल्यावर्षी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये रोख दिले होते. परंतु, यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ६ हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाला ५२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असा प्रस्ताव सरकाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यावर त्वरित कार्यवाही केली असती, तर एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता आली असती, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.