मुंबई : यंदा उसाचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. या हंगामात एकूण २०० कारखाने सुरू झाले होते, त्यापैकी १९९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील ‘विघ्नहर’ सहकारी साखर कारखाना सुरू आहे, तोही आठ दिवसांत बंद होईल. दरम्यान, बुधवारअखेर ८० लाख टन निव्वळ साखर उत्पादन झाले आहे. उपपदार्थ वगळता निव्वळ साखर उतारा ९.४८ मिळाला आहे.

राज्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरुवातीपासून विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे एक महिना उशिराने, १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला. तरीही कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवला. उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला आहे. यंदाच्या हंगामात ९९ सहकारी आणि १०१ खासगी, असे २०० कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी बुधवारअखेर सुमारे ८५२ लाख टन उसाचे गाळप करून ८० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.

ठराविक कारखाने वगळता यंदाच्या हंगामाची स्थिती वाईट आहे. कारखान्याचे गाळप सरासरी १४० दिवस चालल्याशिवाय कारखाने फायद्यात येत नाहीत. पण, यंदाचा हंगाम सरासरी ८३ दिवस चालला. हा हंगाम अत्यंत कमी दिवसांचा ठरला. एकीकडे खर्च वाढला, दुसरीकडे गाळपाचे दिवस कमी झाल्यामुळे कारखान्यांवर आर्थिक बोझा वाढला आहे. परिणामी ९० टक्के कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात आहेत.

पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ.

कारखाने आर्थिक अडचणीत

कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात आघाडीवर आहे. येथील चाळीस कारखान्यांनी २०२ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ११.०८ टक्के साखर उताऱ्याने २२ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.

● सोलापूर विभागाला उसाच्या तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. हंगाम लवकर संपल्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. साखर आयुक्तालयाने नुकतेच पंधरा कारखान्यांना थकीत देयकाच्या वसुलीसाठी नोटीसा काढल्या आहेत, त्यात सोलापुरातील १० कारखान्यांचा समावेश आहे.