मुंबई : बहिरेपणाने पीडित असलेल्या सर्व वयोगटातील व्यक्तींचे वैद्यकीय पुनर्वसन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या तीन वर्षांत ६,०७० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, या कालावधीत ५,७१५ कर्णबधिर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानांतर्गत मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये या कालावधीत एकूण दीड लाख कर्णबधिर रुग्णांची तपासणी करण्यात आली.
कर्णबधिरता ही मानवी जीवनातील एक संवेदनक्षम व्याधी आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतातील अंदाजे ६३ दशलक्ष लोक लक्षणीय श्रवणविषयक कमतरतेमुळे ग्रस्त आहेत. अशा ग्रस्त लोकांचे भारतीय लोकसंख्येत अंदाजे प्रमाण ६.३ टक्के आहे. राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात सन २०१०-११ या आर्थिक वर्षात पहिला टप्पा आठ जिल्ह्यांत राबविण्यात आला. सन २०११- १२ मध्ये उर्वरित आठ जिल्ह्यांत दुसरा टप्पा राबविण्यात असून सन २०२१- २२ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आणखी १८ जिल्ह्यांत राबविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सद्यस्थितीत हा कार्यक्रम राज्यात एकूण ३४ जिल्हा रुग्णालयांत राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालय व अंगीकृत रुग्णालयांमध्ये या कार्यक्रमांतर्गत सेवा पुरविली जाते.
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अनेक आरोग्य सेवा-सुविधा पुरविल्या जातात. यात ऐकू येणे कमी होणे आणि बहिरेपणासाठी जबाबदार असलेल्या कानाच्या समस्या लवकर ओळखणे, निदान करणे आणि उपचार करणे, बहिरेपणाने पीडित असलेल्या सर्व वयोगटातील व्यक्तीचे वैद्यकीय पुनर्वसन, जिल्हा रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले योजनेच्या सहाय्याने श्रवण यंत्र वितरित केले जाते, यूडीआयडी ऑनलाईन प्रमाणपत्र आणि अंपगासाठीचे प्रमाणपत्र रुग्णांना वितरित केले जाते, कॉक्लियर इम्प्लांटच्या रुग्णांना पुनर्वसनासाठी पुढील केंद्रात संदर्भित केले जाते.