मुंबई : राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत. नोटाबंदी, करोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्ती, दोन वर्षे होत असलेला अति पाऊस आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत द्राक्षाला दर नसल्यामुळे गत चार – पाच वर्षांत पन्नास हजार एकरने द्राक्ष क्षेत्र कमी झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोटाबंदीनंतर द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. यानंतर करोना टाळेबंदीचा दुसरा फटका बसला. त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत राहिला, असे द्राक्ष बागायतदार संघाच्या विज्ञान समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत अति पाऊस झाला (पान १० वर)(पान १ वरून) आहे. वर्षभर सतत पाऊस होत राहिल्यामुळे यंदा द्राक्षाला अपेक्षित प्रमाणात घड लागले नाहीत. एकीकडे उत्पादन खर्चात वेगाने वाढ होत आहे. बिहार, उत्तर प्रदेशमधून मजूर आणावे लागत आहेत. औषधे, रासायनिक खतांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागांची काढणी करून फुलशेती, भाजीपाला आणि ऊस शेतीकडे वळत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त

दर्जेदार द्राक्ष, बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव तालुक्यात दहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील द्राक्षबागा काढून टाकण्यात आल्या आहेत. निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्येही द्राक्ष क्षेत्रात वेगाने घट होत आहे.

सरकारसंशोधन संस्थांत ताळमेळ नाही

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात ताळमेळ नाही. त्यामुळे द्राक्ष लागवडीखालील नेमक्या क्षेत्राची माहितीही उपलब्ध नाही. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते. पण त्याचा जादा वापर सुरू आहे. याच्या अतिरेकी वापरामुळे द्राक्ष मण्यांची लांबी वाढत असली तरी चवीवर परिणाम होत आहे. तुटलेल्या द्राक्षबागांचे क्षेत्र ६० हजार एकरांहून जास्तही असू शकते, अशी माहिती चंद्रकांत लांडगे यांनी दिली.

हेही वाचा : कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला

नाशिकच्या तुलनेत सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून निर्यात कमी होते. देशांतर्गत बाजारात दर मिळत नाही, त्यामुळे द्राक्षबागांचे क्षेत्र घटत आहे. गेल्या पाच वर्षांत ५० ते ६० हजार एकरने द्राक्ष क्षेत्र घटले आहे. – शिवाजी पवार, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra grape cultivation decrease on 50 thousand acres land in five years due to increase in production cost css