मुंबई : राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान सरासरी ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे कलिंगड, पपई, स्ट्रॉबेरी, केळी होरपळ होत आहे. टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. एकीकडे उन्हाचा चटका बसत असतानाच दुसरीकडे पपई, टोमॅटो आणि कलिंगडाला अवघा पाच ते आठ रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी होरपळ होत आहे.
राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कमी – अधिक प्रमाणात फळे आणि भाजीपाला उत्पादन घेतले जाते. सध्या द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पपईचा हंगाम अतिम टप्प्यात आहे, तर कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडीचा हंगाम जोमात सुरू आहे. पण, तापमान वाढीमुळे पपई, कलिंगड स्ट्रॉबेरीवर उन्हाचे चटके पडत आहेत. फळे करपून गळून पडत आहेत. पपईच्या झाडाला पाला कमी असेल तर संपूर्ण फळ सडून जात आहे. द्राक्षाचे घड करपून जात आहेत.
सध्या काढणी सुरू असलेल्या टोमॅटोलाही फटका बसत आहे. टोमॅटो कमी दिवसांत पक्व होत असल्यामुळे टोमॅटोचा आकार लहान राहत आहे. अन्य भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. वाढते उन्ह, पाण्याच्या टंचाईमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. जुलै, ऑगस्टमधील टोमॅटोचे दर वाढतात, त्या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी गुढी पाडव्यानंतर नवीन टोमॅटोची लागवड होते. नव्याने लागवड झालेल्या टोमॅटोची रोपे लहान असल्यामुळे करपून, जळून जात आहेत.
एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन कमी निघते, अशा काळातच पपई, कलिंगड, टोमॅटोचे दर प्रति किलो पाच ते सात रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत निघत नाही. रमजानपर्यंत पपई प्रतिकिलो १० ते १५ रुपये किलो असणारा दर आता ५ ते ७ रुपये किलोंवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.
भाजीपाला पिकांना फटका
उन्हामुळे पपईवर चट्टे पडत आहेत. गाठी होत आहेत. संपूर्ण पपईच सडून जात आहे. कलिंगड, काकडीची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. पपईचा अद्याप ३० टक्के हंगाम शिल्लक आहे. सध्या जेमतेम पाच ते सात रुपये दर मिळतो आहे. सरासरी १५ ते २० सरासरी दर मिळाला तरच चार पैसे शिल्लक राहतात. सध्या पपईला उत्पादन खर्चा इतकाही दर मिळत नाही, अशी माहिती शेणपूर (ता. साक्री. जि, धुळे.) येथील पपई उत्पादक राकेश गोरखराव काकुस्ते यांनी दिली.
शनिवारी मिळालेले दर असे
पपई – ५ ते ७ रुपये
कलिंगड – ७ ते १० रुपये.
टरबूज – ७ ते १० रुपये
केळी – ५ ते १२ रुपये
खरबूज – ८ ते १० रुपये
टोमॅटो – ५ ते ९ रुपये
(शेतकऱ्यांना मिळणारा दर, प्रतिकिलो)
(संदर्भ – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)