अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशात २००१ ते २०२० या २० वर्षांच्या काळात एक हजार ८८८ जणांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ८९३ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आणि ३५८ कर्मचार्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या कालावधीत केवळ २६ पोलिसांना दोषी ठरवण्यात आले होते. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २००१-२०२० च्या अहवाल वरील माहिती जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये (फेब्रुवारीपर्यंत) दोन हजार १५२ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तसेच १५५ आरोपींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. येथे ४४८ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक १२९ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. ही बाब खूप गंभीर आहे. देशात दररोज ६ आरोपींचा कोठडीमध्ये मृत्यू होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन (३२) यांना अटक केली होती. पोलीस कोठडीतील आरोपी गुप्ता, पाल आणि थापन यांना गुन्हे शाखेने मुंबई पोलीस आयुक्तालयातील कोठडीत ठेवले होते. मुंबई पोलीस आयुक्तालयातील ज्या कोठडीत अनुज थापनला ठेवण्यात आले होते, तेथेच आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेचे आरोपी एकत्र ठेवण्यात आले होते. सुरक्षा आणि देखरेखीसाठी चार पोलिसांना तैनात करण्यात आले होते. थापन याने १ मे रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान कोठडीतील शौचालयात फाडलेल्या चादरचा तुकडा आणि खिडकी यांच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. थापन याच्या कोठडीतील मृत्यूची नोंद आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सीआयडी याप्रकरणी तपास करीत आहे. शवविच्छेदन अहवालातही गळफासामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा : मुंबईत पंतप्रधानांचा रोड शो, तर शिवाजी पार्कच्या सभेत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे दिसणार एकाच व्यासपीठावर?

आरोपीने कोठडीत आत्महत्या केल्याची गेल्या नऊ महिन्यातील ही तिसरी घडला आहे. तत्पूर्वी, ८ सप्टेंबर २०२३ रोजी, मरोळ (पवई) निवासी सोसायटीतील हाऊसकीपिंग कर्मचारी विक्रम अटवाल (४०) याने अंधेरीतील पोलीस कोठडीत कथितरित्या आत्महत्या केली होती. त्याच्यावर ३ सप्टेंबर रोजी हवाई सेविकेची मरोळ येथील सदनिकेत हत्या केल्याचा आरोप होता. अटवालनेही कोठडीतील शौचालयात गळफास घेतला होता. त्याने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु त्याच्या गुन्ह्यामुळे त्याच्या कुटुंबाची बदनामी होऊ शकते, या चिंतेने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अटवालच्या आत्महत्येपूर्वी साधारण दीड महिना आधी आणखी एका हत्येच्या घटनेतील आरोपीने आत्महत्या केली होती. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपक जाधव (२८) याने २८ जुलै रोजी बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती. बोरिवली (प.) येथील रहिवासी असलेल्या जाधवला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी एका हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. बोरिवली पोलिसांनी त्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले होते आणि त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. त्याला सामान्य पोलीस कोठडीतमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र पुन्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली होती.

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकणातील आरोपींवर नुकताच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला होता. या गोळीबारानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्या प्रकरणातील आरोपी थापनच्या आत्महत्येनंतर पोलीस कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर बाब म्हणजे थापन असलेल्या कोठडीच्या सुरक्षेसाठी चार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यानंतरही ही घटना घडली.

हेही वाचा :सीईटीच्या तारखा पुन्हा बदलल्या, आठ परीक्षा पुढे ढकलल्या

आतापर्यंत पोलिसांच्या कोठडीत आरोपींच्या संशयास्पद मृत्यूची अनेक प्रकरण घडली आहेत. अकोल्यामध्ये एप्रिल महिन्यात संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या एका आरोपीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तीन पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मारहाणीत या आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप या पोलिसांवर आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात ख्वाजा युनूस प्रकरण फार गाजले होते. २००२ घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणाततील संशयीत असलेल्या २७ वर्षीय ख्वाजा युनुस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने अभियंता होता. दुबईत काम करत होता. त्याच्याविरोधात ‘पोटा’ कायदयांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ६ जानेवारी २००३ रोजी युनुसची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ७ जानेवारी २००३ रोजी तो बेपत्ता झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. युनुसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबाद येथे घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन युनुस बेडीसह पळून गेला व शोधूनही तो सापडला नाही, असे पोलिसांकडून सागण्यात आले. त्यावेळी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून सचिन वाझेंसह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. युनुसला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या तोंडातून प्रचंड रक्त वाहत होते आणि त्यानंतर तो आम्हाला काही दिसला नाही, असे युनुससह असणाऱ्या सहआरोपींनी न्यायालयात सांगितले. ख्वाजा युनुसच्या साथीदाराने केलेल्या दाव्याच्या आधारे त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली. या याचिकेच्या आधारे न्यायालयाने या घटनेचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. तसेच सचिन वाझे यांनी युनुस प्रकरणात खोटी आणि संशयास्पद तक्रार दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि खुनाच्या आरोपाखाली सचिन वाझे यांच्यासह चार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वाझे यांना या प्रकरणी ३ मार्च २००४ रोजी अटक झाली. पुढे दोन महिन्यांनी वाझेंची जामिनावर सुटका झाली.

हेही वाचा :विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक

कोठडीत एखाद्या आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याप्रकरणी त्रयस्थ तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येते. मुंबईत गुन्हे शाखा याबाबत तपास करते, तर राज्य पातळीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास केला जातो. पण अनुज थापनचा मृत्यू गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना झाल्यामुळे याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करण्यात येत आहे. आरोपीच्या कोठडीतील मृत्यूननंतर सीआरपीसी कायद्याच्या कलम १७४ अन्वये तपास यंत्रणेद्वारे चौकशी केली जाते. याशिवाय सीआरपीसी कायद्याच्या कलम १७६ अन्वये न्यायालयीन चौकशी करण्यात येते. त्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्या पोलिसावर कारवाई करण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra how many deaths in police custody salman khan firing case anuj thapan suicide mumbai print news css