मुंबई : नवा गणवेश, नवे दप्तर, नवीन वह्यापुस्तके आणि विद्यार्थ्यांची वर्दळीने राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा गजबजल्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील सर्व शाळा शनिवार, १५ जून रोजी सुरू झाल्या. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, फुलांची आरास, सुविचारांनी सजलेले स्वागतपर फलक, विद्यार्थ्यांची गोड सुरुवात होण्यासाठी पेढे व गुलाब पुष्प वाटप करण्यात आले. बालवाडीतील चिमुकल्यांचे डोळे पाणावले होते, तर पुन्हा शाळा उघडल्यामुळे माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांसह पालकांचे घोळकेही शाळांच्या प्रवेशद्वारांवर पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील विविध शाळांमध्ये निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या मुंबईत विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी शिक्षकांच्या भेटीगाठी घेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत शिक्षक उमेदवारांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराचीही संधी घेतली. तसेच, उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर सहकारी शिक्षकांची भेट झाल्यामुळे शिक्षक वर्गामध्येही आनंदाचे वातावरण होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत असल्यामुळे यादृष्टीने नियोजन व पूर्व तयारीसाठी शिक्षण विभाग तत्पर झाला आहे. शाळांमध्येही विशेष बैठकांची सत्रे पार पडत आहेत. तसेच, पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत, यादृष्टीनेही पालक व शाळा प्रशासनाची लगबग सुरू होती. गेल्या अनेक वर्षांपासून शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा मनोदय अनेक शाळांनी व्यक्त केला.

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा : मुंबई: मृत पोलीस व्यक्तीगत आयुष्यात नैराश्याने ग्रासलेला, मोबाइल चोरांनी विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा खोटा

मुंबईतील परळमधील डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी इनडोअर खेळांचे वर्ग, अद्ययावत संगणक कक्ष, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन वर्ग उपलब्ध करून देण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागतपर गीतांनी स्वागत करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. शिरोडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश पाटील यांनी दिली. तर आर. एम. भट हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एस. महाले म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून आणि ढोल – ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने शिक्षकांची बैठकही घेण्यात आली.’

दरम्यान, राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत एकसमान रंगांचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. याची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्याचेही जाहीर केले गेले. विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतलेला असताना अचानक एक गणवेश आणि दुसऱ्या गणवेशाचे कापड देण्यात येणार आहे. मात्र शाळा सुरू होण्याच्या तोंडावर एक गणवेश आणि दुसऱ्या गणवेशाचे कापड देण्याचे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला पत्र पाठवून अडचणी मांडल्या आहेत. विदर्भातील शाळा १ जुलै रोजी सुरू होणार आहेत, तर उर्वरित शाळा १५ जूनला सुरू झाल्या आहेत, असे असताना विविध तांत्रिक कारणास्तव गणवेश वाटपाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

हेही वाचा : मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा, एक आरोपी नवनिर्वाचित खासदाराचा नातेवाईक

महापालिकेच्या शाळेत आयुक्तांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबईतील बहुतांश शाळा शनिवारी १५ जून रोजी सुरू झाल्या असून मुंबई महापालिकेच्या शाळांमध्येही पहिला दिवस साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वरळी सी फेस शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वागत केले. गुलाब पुष्प देऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंचे वाटपही यावेळी करण्यात आले. महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेत पहिली इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन यावेळी आयुक्तांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पालक वर्गासोबतही गगराणी यांनी संवाद साधला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपआयुक्त चंदा जाधव, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. वरळी सी फेस शाळेतील खगोलशास्त्र प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळेची गगराणी यांनी पाहणी केली. यावेळी ‘विद्यार्थी प्रवेश पाडवा’ आणि ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा : मुंबईतील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात धाव

प्रवेश पाडवा

शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी ‘प्रवेश पाडवा’ आयोजित करण्यात आला होता. शाळेत पहिल्यांदाच प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम प्रवेश पाडवा अंतर्गत राबविण्यात येतात. सुरुवातीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी हा प्रवेश पाडवा उपक्रम सुरू राहणार आहे.

पहिले पाऊल

विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवडीचा कल शोधणे, हे पहिले पाऊल उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची आवड आणि कल लक्षात घेऊन गट तयार करण्यात येतात. गटातील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आवडीचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण होणे, शिक्षणाची गोडी लागावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे; त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पालक वर्गाचा सहभाग करून घेणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी, समुपदेशक कक्ष आदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात येतो.