मुंबई : दिवाळीच्या काळात बाजार समित्यांमध्ये आठवडाभर बंद असलेली कांद्याची खरेदी – विक्री. गेल्या उन्हाळी हंगामात उत्पादनात झालेली घट आणि परतीच्या, बिगर मोसमी पावसामुळे काढणीला आलेला खरीप हंगामातील कांदा सडल्यामुळे कांद्याची खरेदी -विक्रीचा साखळी विस्कळीत झाली आहे. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांदा शंभर रुपये किलोंवर गेला आहे. दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून शेतकरी आणि ग्राहकांची लूट सुरू आहे. अजून दोन महिने दरात तेजी राहण्याचा अंदाज आहे.
दिवाळीच्या काळात आठवडाभर नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी – विक्री बंद असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर कांद्याची खरेदी -विक्रीची साखळी विस्कळीत होऊन दरवाढ होत असते. यंदा उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा, अति उष्णता आणि अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा फारसा शिल्लक नाही. खरीप हंगामातील कांद्याची काढणी आता सुरू झाली आहे. पण, परतीच्या आणि बिगरमोसमी पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊन पूर्ण शेतीच वाहून गेल्यामुळे ५० टक्क्यांहून जास्त कांद्याचे नुकसान झाले आहे.
सध्या बाजारात खरीप कांद्याची आवक सुरू झाली आहे. पण सरासरीच्या जेमतेम ५० टक्केच आवक होत आहे. त्यामुळे बाजारात तुटवडा जाणवत आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम संपला आहे आणि खरीप कांद्याची पुरेशी आवक होत नसल्यामुळे दरात तेजी आली आहे. पुढील महिना – दोन महिने दरवाढ राहील. जानेवारपासून उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात दिलासा मिळेल, अशी माहिती कांदा व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
कांद्याचा राखीव साठा कुठे गेला
केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. साधारण १६०० ते ३००० रुपये क्विंटल दराने हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला होता. हा कांदा कुठे आहे, असा प्रश्न शहरी ग्राहकांनी सरकारला विचारला पाहिजे. राखीव साठ्यातील कांदा बाजारात का आणला जात नाही, हा प्रश्नच आहे. मुळात राखीव साठ्यासाठी केलेल्या खरेदीत मोठा गैरव्यवहार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जास्तीत -जास्त ५० ते ५५ रुपये दराने व्यापारी कांदा खरेदी करतात, तो कांदा मुंबईत येईपर्यंत शंभर रुपये किलो कसा होतो. सरकारचे कांदा खरेदीवर नियंत्रण असते, मग कांदा विक्रीवर का नियंत्रण ठेवले जात नाही. सरकारच्या आशीर्वादाने दरवर्षी शेतकरी आणि ग्राहकांची लूट करून व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे केले जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
टोमॅटो, बटाटा ५० ते ६० रुपये किलोंवर
टोमॅटो उत्पादनात काहिशी सुधारणा झाल्यामुळे राज्यात टोमॅटोचे दर किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोंवर आहेत. वर्षातील आठ महिने बटाटा उत्तरेतून येतो. राज्यात उत्पादीत होणारा बटाटा फक्त दोन महिने पुरतो. किरकोळ बाजारात बटाटाही ५० ते ६० रुपये किलोंवर आहे. पंधरा दिवसांनंतर टोमॅटोची आवाक वाढून दर कमी होण्याची शक्यता आहे. पण, बटाट्याचे दर वर्षभर तेजीत राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
कांदा दरवाढीची कारणे
१) दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये कांदा – विक्री आठवडाभर बंद होती
२) गेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम संपल्यामुळे आवक घटली
३) काढणीला आलेला खरीप कांदा परतीच्या, बिगरमोसमी पावसामुळे सडला
४) खरीप कांद्याच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट
५) बाजारातील कांद्याची आवक ५० टक्क्यांनी घटली