मुंबई: वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी २०२५ मध्ये घरविक्रीला समाधानकारक सुरुवात झाली असून मुंबईत १२,२४९ घरांची विक्री झाली असून यातून सरकारला ९९४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील १३ वर्षातील जानेवारीतील घरविक्रीचा हा उच्चांक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळानंतर प्रत्येक वर्षी घरांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. करोना काळात हक्काचे घर घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याने घरविक्रीत वाढ होत आहे. त्यामुळेच २०२३ च्या संपूर्ण कालावधील मुंबईत एकूण १ लाख २६ हजार ९०५ घरांची विक्री झाली होती. तर २०२४ मध्येही १ लाख २८ हजार २१२ घरे विकली गेली. आता नव्या वर्षाची सुरुवातही समाधानकारक झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईत १२, २४९ घरांची विक्री झाली असून त्यातून मुद्रांक शुल्क वसूली रुपाने ९९४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी, जानेवारी २०२३ मध्ये घरांच्या विक्रीची संख्या १०,९६७ अशी होती. मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदाची घरविक्री अधिक आहे. पण त्याचवेळी गेल्या १३ वर्षांतील जानेवारी महिन्यातील घरविक्रीचा हा उच्चांक आहे. जानेवारी २०१३ मध्ये मुंबईत केवळ ५,५९९ घरांची विक्री झाली होती तर जानेवारी २०१४ मध्ये ५,४९७ घरे विकली गेली होती.

जानेवारी २०१५ मध्ये ६२१४, २०१६ मध्ये ५१६३,२०१७ मध्ये ३६१९, २०१८ मध्ये ६२७०, २०१९ मध्ये ४६०५, २०२० मध्ये ६१५० घरांची विक्री झाली. करोना काळापासून अर्थात २०२१ पासून मात्र घरविक्री वाढ होत गेली त्यामुळेच जानेवारी २०२१ मध्ये घरविक्रीची संख्या ६१५० वरुन थेट १०, ४१२ वर गेली. जानेवारी २०२२ आणि २०२३ मध्ये ही संख्या काहीशी खाली आली. जानेवारी २०२२ मध्ये ८१५५ तर जानेवारी २०२३ मध्ये ९००१ घरांची विक्री झाली. मात्र जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा घरविक्रीत वाढ झाली आणि त्यामुळेच जानेवारी २०२४ मध्ये १०, ९६७ घरांची विक्री झाली. अशात चालू वर्षात जानेवारी महिन्यातील घरविक्रीने उच्चांक गाठत थेट १२ हजारांचा टप्पा पार केला आहे. घर विक्रीत वाढ झाल्याने महसूलातही वाढ झाली आहे. मागील वर्षी जानेवारीत घरविक्रीतून ७६० कोटींचा महसूल मिळाला होता. तर यंदा ९९४ कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील १३ वर्षातील हा उच्चांकी महसूल आहे.

किंमत वाढली तरीही…

जानेवारी २०२५ मधील घरविक्रीअंतर्गत २ कोटी ते ५ कोटी किंमतीच्या घरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये २ कोटी ते ५ कोटी किंमतीची १२८३ घरे विकली गेली होती तिथे जानेवारी २०२५ मध्ये १६८० घरांची विक्री झाली आहे. ५ कोटीहून अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीतही जानेवारीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये ५ कोटींहून अधिक किंमतीची ४०४ घरे विकली गेली होती. तेथे जानेवारी २०२५ मध्ये ही संख्या थेट ६१८ वर गेली आहे. एकूणच जानेवारी २०२५ मध्ये घरांची विक्री समाधानकारक झाली असून चालू वर्षात घरविक्रीला चालना मिळेल आणि घरविक्रीत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांना आहे.