लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: पावसाळा सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये डोळे येण्याची साथ पसरली होती. राज्यामध्ये दिवसाला साधारणपणे दररोज १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील डोळे येण्याची साथ आटोक्यात येत होती. मात्र १ ऑक्टोबरच्या अहवालानुसार संपूर्ण राज्यामध्ये डोळे आलेला एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आटोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यामध्ये ऑगस्ट सुरू झाल्यापासून डोळे आलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक होते. राज्यामध्ये आतापर्यंत ५ लाख ५६ हजार ४३० रुग्ण सापडले आहेत. पुण्यामध्ये सर्वाधिक ५२ हजार ५४२ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात ५० हजार ५१३, जळगाव २९ हजार ८५६, चंद्रपूर २७ हजार ३५५ रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा… मुंबई: विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
ऑगस्टमध्ये दिवसाला सरासरी १० ते १२ हजार रुग्ण सापडत होते. डोळे येण्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत होते. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून डोळे येण्याची साथ हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील १ ऑक्टोबर रोजी रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यामुळे डोळे येण्याची साथ आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.