मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त परिचित व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या काही तरूणांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली कुरार पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमासाठी ३७ वर्षीय तक्रारदार तरूण मालाड पूर्व परिसरातील पिंपरी पाडा येथे राहणाऱ्या परिचित व्यक्तीच्या घरी जात होते. त्यांच्यासोबत सात-आठ जण होते. कांदिवली येथे ते सर्वजण भेटले. मालाड पूर्व येथील पठाणवाडी परिसरात त्यातील सात जणांना तेथे जमलेल्या काही व्यक्तींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तक्रारदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बांबूने मारहाण करण्यात आली. तक्रारदार तरूणाने याबाबतची माहिती तेथे तैनात पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या मुलांना बाहेर काढले. त्या सर्व जखमी मुलांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल झाल्यानंतर काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण पोलिसांनी तात्काळ सर्वत्र बंदोबस्त तैनात करून परिस्थितीत नियंत्रणात आणली. मालाड परिसरात शांतता असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
याप्रकरणी कुरार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५ (२), ३५२, १८९ (२), १८९ (४), १८९(९), १९० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून चित्रीकरणाद्वारे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.