मुंबई : माटुंगा पूर्व परिसरातील झोपडपट्टीनजीक असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी बीट मार्शल, मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाला देण्यात आली, त्याची दखल घेऊन पोलिसांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देताना या प्रकरणी कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला व याचिका निकाली काढली.
माटुंगा पूर्व येथील गुजराती केळवणी मंडळाच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षितेता मुद्दा उपस्थित करून मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही शाळा झोपडपट्ट्यांनी वेढलेली असून मुलींना शाळेत येण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करावा लागतो. संपूर्ण परिसरात गैरप्रकारांची शक्यता असून मुलींची सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा मंडळाने जनहित याचिकेतून उपस्थित केला होता. तसेच, शाळेच्या परिसराजवळ आवश्यक अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन पोलिसांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा…मुंबई : प्रवाशांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार, अनेक ठिकाणी बस थांब्यांऐवजी केवळ बस खांबच
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊन खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. झोपडपट्टी नजिकच्या परिसरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी नमूद केल्यानुसार योग्य उपाययोजनांबाबत तूर्तास विश्वास ठेऊन याचिका निकाली काढत आहोत. परंतु, या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांचा कोणत्याही हलगर्जीपणा आढळून आल्यास न्यायालय त्याची गभीर दखल घेईल आणि कठोर निर्णय घेईल, असेही खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले.
हेही वाचा…तोटा कायम अन् अपघातही! ‘बेस्ट’ची संचित तूट आठ हजार कोटींवर!
पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, संपूर्ण माटुंगा विभागात बीट मार्शल आणि मोबाईल व्हॅन वेगवेगळ्या भागात नियुक्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बीट मार्शल व मोबाईल व्हॅन संपूर्ण परिसरात गस्त घालत असतात. मोबाईल व्हॅनद्वारे गस्त घालणाऱ्या प्रत्येक निर्भया पथकात उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाची एक महिला अधिकारी, एक महिला हवालदार, एक पुरुष हवालदार आणि एक पुरुष वाहन चालकाचा समावेश असून हे पथक परिमंडळातील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याव्यतिरिक्त शाळा, महाविद्यालय उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत एक किंवा दोन हवालदारामार्फत महाविद्यालय आणि शाळा परिसरात गस्त घालण्यात येत असल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.