मुंबई : मीरा रोड येथे जानेवारीमध्ये उसळलेल्या हिसांचारानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन यांनी केलेली भाषणे ही द्वेषपूर्ण असल्याचे मुंबई आणि मिरारोडच्या पोलीस आयुक्तांना सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

राणे आणि जैन यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी कृत्य केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. राणे यांच्या विरोधात याप्रकरणी मानखुर्द आणि घाटकोपर येथे नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मालवणी पोलीस ठाण्यात आधीच दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा : अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर

या कथित प्रक्षोभक भाषणामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासंदर्भातील कलम राणे आणि जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताना लावण्यात आले नसल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह यांनी घेतला. त्यावर, आताच गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू झाला आहे. त्यामुळे, तपासादरम्यान हे कलमही लावण्याची आवश्यकता वाटल्यास त्याचा समावेश करण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षकरांची बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणी करण्यात येणाऱ्या तपासाचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

हेही वाचा : क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत

दरम्यान, मिरारोड येथे जानेवारी महिन्यात झालेल्या हिसांचारानंतर कथित प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा. सिंह यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केली होती. तसेच, या तिन्ही आमदारांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाचे दृष्यफिती पाहून त्या आधारे गुन्हा दाखल होत असल्यास न्यायालयाला त्याची माहिती देण्याचे आदेश मुंबई व मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, राणे आणि जैन यांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर, दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

हेही वाचा : गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

१३ गुन्हे दाखल

मीरारोड येथे २२ ते २६ जानेवारीदरम्यान अनेक हिसांचाराच्या घटना घडल्या. मात्र, त्या तुलनेत गुन्हे नोंदवले गेले नाही, असा दावा एका याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयात केला गेला. त्यावर, याचिकाकर्त्यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगून याप्रकरणी १३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचा प्रतिदावा सरकारी वकिलांनी केला.