मुंबई : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बेस्ट बसचा रिक्षाला धक्का लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशाने बसवर दगडफेक केल्याची घटना सोमवारी सायंकाळी मुलुंड परिसरात घडली. या दगडफेकीत इयत्ता चौथीमध्ये शिकणारा विद्यार्थी जखमी झाला असून याप्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
मुलुंडमधील जी. व्ही. पालिका शाळेजवळ सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधून घरी सोडण्यात येते. नवघर परिसरातील जी. व्ही. पालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना घेऊन बेस्ट बस ऐरोली परिसरात जात होती. बेस्ट बस वळण घेत असताना पाठीमागून आलेली एक रिक्षा बसवर धडकली. बेस्ट चालकाने तत्काळ बस रस्त्यालगत उभी केली. यावेळी रिक्षातून उतरलेल्या दोन प्रवाशांनी बेस्ट चालक आणि वाहकाला शिवीगाळ केली. त्यानंतर एका प्रवाशाने बेस्टच्या मागील काचेवर दगड फेकून मारला. यावेळी बसमध्ये १५ ते २० विद्यार्थी होते. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या रोशन साकलिया (१०) याच्या डोक्याला काचेचा तुकडा लागल्याने तो जखमी झाला. बस चालकाने तत्काळ या मुलाला मुलुंडच्या वीर सावकार रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांना हल्ला करणाऱ्या नागनाथ मासाळ (२७) आणि आकाश गायकवाड (२४) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.