मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी अशा तिसऱ्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण करून २५ किमीचा हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यास नागपूर ते इगतपुरी असा थेट प्रवास करता येणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमीचा आहे. त्यातील नागपूर ते भरवीर असा ६०० किमीचा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरु आहे. भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने या टप्प्यास विलंब झाला आहे. पण आता मात्र या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मार्चमध्ये हे काम पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. हा टप्पा २५ किमीचा असून तो सेवेत दाखल झाल्यास ६२५ किमीचा टप्पा कार्यान्वित होईल. तर इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम वेगात पूर्ण करणे हे एमएसआरडीसीचे लक्ष्य आहे. हा शेवटचा इगतपुरी ते आमणे टप्पा वाहतुक सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी कमी होईल.